संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक (Photo Credit - X)
अटक आरोपींची नावे आणि गुन्हा दाखल
या प्रकरणी आबुज अमर चाऊस (३०, रा. सहेदा कॉलनी), मोहम्मद इसान मोहम्मद यासीन (३५, रा. कटकट गेट) आणि समीर चाँद खान उर्फ पप्पु (३४, रा. रहेमानिया कॉलनी) या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडेगावपासून पाठलाग, छावणीत मुसक्या आवळल्या
एका कारमधून (एमएच ०५ एएक्स-३०३६) एमडी या अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे म्हस्के यांनी पथकासह पडेगाव परिसरात सापळा रचला.
तस्करांना कारवाईची कुणकुण लागताच त्यांनी कार भरधाव वेगाने पळवली. मात्र, म्हस्के आणि त्यांच्या पथकाने पडेगावपासून कारचा पाठलाग करून आरोपींना छावणी परिसरात गाठले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना पकडून कारची झडती घेतली असता, कारमध्ये ६१ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.
मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार, एमडी मालेगावहून आणले
गुन्ह्यातील मुख्य आरोपी आबुज अमर चाऊस हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. चौकशीदरम्यान, आबुज याने जप्त केलेले एमडी धुळे आणि मालेगाव येथून आणल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात जप्त केलेली कार आबुजने एका डीलरकडून खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी छावणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कारवाई करणारे पथक
पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, हवालदार लाला पठाण, नितेश सुंदडें, जाधव, निभूवन, काळे आदींनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.






