मोठी बातमी ! नागपूर विमानतळावर पाच कोटींचे ड्रग्ज जप्त; बँकॉकहून आलेला प्रवासी अटकेत (संग्रहित फोटो)
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोहा-नागपूर विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून ५ किलो ‘हायड्रोपोनिक मारिजुआना’ नावाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत ५ कोटी रुपये आहे. बँकॉकमधून हे ड्रग्ज आणले होते.
डीआरआय आणि कस्टमच्या विशेष इंटेलिजन्स आणि इन्वोस्टिगेटिंग शाखेने ही कारवाई केली. न्यायालयाने आरोपीची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. हे ड्रग्ज चरस, गांजा पेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसानंतर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने या ड्रग्जच्या तस्करीची आंतराष्ट्रीय साखळी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे थायलंड, उइस्बेकिस्तान आणि सौदी अरब अशा तीन देशातून मोकाटपणे फिरत आल्यावर त्याला नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) आणि कस्टम्सच्या विशेष इंटेलिजन्स व इस्टिगेटिव्ह बॅच (एसआयआयबी) ने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. यावेळी पकडण्यात आलेले ड्रग्ज चरस, गांजा आणि भांगपेक्षा अधिक प्रभावी असून, त्याचा मानवी मेंदूवर झपाट्याने परिणाम होतो. ‘हाय-क्लास ड्रग्ज’ म्हणून या पदार्थाला मोठी मागणी असून, या घटकात ‘टेट्राहायड्रोकॅनाविनील’ (टीएचसी) चे प्रमाण साध्या गांजापेक्षा अधिक आहे.
ड्रग्जचा होतो मेंदूवर थेट परिणाम
मातीऐवजी पाण्यात पोषकतत्वे देऊन झाडे वाढवण्याच्या आधुनिक पद्धतीला हायड्रोपोनिक शेती म्हणतात. या तंत्रात उगवलेले हायड्रोपोनिक मारिजुआना सध्या गांजापेक्षा अधिक तीव्र आणि जलद नशा देणारे असते. त्यात टेट्राहायड्रोनाबिनोल (टीएचसी) चे प्रमाण जास्त असल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो, त्यामुळे हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक आणि व्यसनकारक मानले जाते.
गांजा विक्रीप्रकरणी दोघांना अटक
दुसऱ्या एका घटनेत, गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.






