संग्रहित फोटो
पुणे : स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेला घेऊन पोलिसांचे पथक पुन्हा त्याच्या ‘गुनाट’ गावात पोहचले आहे. तीन दिवसांच्या फरार काळात तो गावातील शेतात लपला होता. त्याने त्याचा मोबाईलही याच परिसरात लपविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी त्याला घेऊन तो लपलेल्या ठिकाणाची पाहणी केली. फरार कालावधीत ज्यांनी गाडेला मदत केली तसेच ज्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी तो गेला अशा जवळपास ७ लोकांचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतले. गाडेच्या घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. शुक्रवारी सकाळपासून पाच अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक त्याला घेऊन तपास करत होते.
स्वारगेट बसस्थानकात दहा दिवसांपूर्वी (दि. २५ फेब्रुवारी) पहाटे बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या प्रकरणात दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याला अटक केली. तो १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. तीन दिवसांपुर्वीच पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांचे पथक तपास करीत आहे.
शुक्रवारी सकाळीच पाच अधिकारी, पंच आणि ३० कर्मचार्यांचे पथक गाडेला घेऊन गुणाट या गावी पोहचले. पोलिसांनी अटक केली असली तरी गाडेचा मोबाईल मिळू शकलेला नाही. प्राथमिक तपासात हा फोन गाडेने गुनाट गावातील शेतात लपवल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने पोलिसांच्या पथकाने गाडेला घेऊन तो लपलेल्या सर्वच ठिकाणाची पाहणी करण्यास सुरूवात केली. या भागात मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना सायंकाळपर्यंत मोबाईल मिळाला नाही. मोबाईलमधून आणखी काही धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरार असताना ज्या लोकांनी गाडेची मदत केली तसेच त्याने ज्या लोकांकडे मदत मागितली अशा ७ लोकांचे पोलिसांनी स्टेटमेंट घेतले आहेत. गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.
पडक्या घरात वास्तव्य
गुन्ह्यानंतर आरोपी गाडे त्याच्या गुनाट गावी गेला. पोलीस मागावर असल्याचे समजताच तो पसार झाला. गावातील शेतामध्ये तो लपून बसला होता. या कालावधीत त्याने पडक्या घरात वास्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्याही ठिकाणी पोलिसांनी शोध मोहिम राबविली.
अत्याचारानंतर नराधम अर्धा तास स्वारगेटमध्ये घुटमळत होता
अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतरही दत्तात्रय गाडे अर्धा तास स्वारगेट बसस्थानक व परिसरातच घुटमळत होता, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात आरोपी परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसून आले आहे. एवढेच नव्हे, तर तो गुन्हा केल्यानंतरही निर्धास्तपणे परिसरात फिरत होता. या घटनेवरून आरोपीला कुठलाही भीतीभाव नव्हता, असे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी शेवटी स्वारगेट परिसरातून एका तरकारीच्या गाडीतून सोलापूर रस्त्याने निघून गेला. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीचा नेमका उद्देश काय होता? तो परिसरातच का थांबला होता? कोणी त्याला मदत केली का? या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.