जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; तब्बल पावणेदोन लाखांना घातला गंडा (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : अल्पावधीत दणदणीत नफ्याचे आमिष दाखवत एका दाम्पत्याने ओळखीचा गैरफायदा घेत इन्फिनिटी कॅपीटल नावाच्या कंपनीत १ लाख ७२ हजार रुपये गुंतवण्यास सांगून फसवणूक केली. हा प्रकार ६ डिसेंबर २०२३ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान सातारा परिसरातील विद्यानगरात घडला.
विनोद बबनराव राजगुरु (वय ४८) आणि ईश्वरी विनोद राजगुरु (वय ४४, दोघे रा. संग्रामनगर, सातारा परिसर) अशी फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याची नावे असून, त्यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात नितीन संतराम शिंदे (वय ४४, रा. विद्यानगर, रेणुका माता कमान, सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी नितीन शिंदे हे पत्नी व मुलांसह सातारा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून राहून संगणक व्यवसाय करतात. परिसरातील जुनी ओळख असल्याने त्यांचा बालमित्र विनोद राजगुरु व त्याची पत्नी ईश्वरी राजगुरु यांच्याशी कौटुंबिक संबंध होते.
हेदेखील वाचा : KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?
६ डिसेंबर २०२३ रोजी विनोद व ईश्वरी राजगुरु हे दोघे शिंदे यांच्या घरी आले. त्यांनी आपण इन्फिनिटी कॅपिटल व कॉर्बो सायन्स या कंपनीत कार्यरत असल्याचे सांगितले. कपंनीतील गुंतवणुकीवर दोन ते तीन महिन्यांत मूळ रकमेवर ३० टक्के नफा मिळतो, तसेच गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असल्याचे आश्वासन देत त्यांनी फिर्यादीला पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले.
टप्याटप्याने केली गुंतवणूक
या आमिषाला बळी पडून नितीन शिंदे व त्यांच्या पत्नीने आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकच्या प्रती दिल्या. त्यानंतर ईश्वरी राजगुरु यांच्या मोबाईलवर कंपनीशी संबंधित आयडी तयार करून देण्यात आल्या. यानंतर फिर्यादीने १ डिसेंबर व १८ डिसेंबर २०२३ मध्ये प्रत्येकी १६ हजार रुपये गुंतवले. ३१ जानेवारी २०२४ रोजी १ लाखांचा धनादेश दिला व त्याच दिवशी रोख ४० हजार दिले असे वेगवेगळ्या टप्प्यांत १ लाख ७२ हजार रुपये गुंतवले.
नफा तर नाहीच मूळ रक्कमही गेली
दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही नफा तर सोडाच, मूळ रक्कमही परत मिळाली नाही. वारंवार मागणी केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. तसेच तुला जे करायचे ते कर, अशी धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर नितीन शिंदे यांनी सातारा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.






