डिजिटल अरेस्टच्या नावाने फसवणूक; कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल (संग्रहित फोटो)
ठाणे : ठाणे शहरातील कापूरबावडी परिसरात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय निवृत्त शिक्षकाला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तक्रारदार किशोर राव यांना २१ एप्रिल २०२६ रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख राकेश अग्रवाल असल्याचे भासवले. आरोपींनी तक्रारदारावर पैशांची अफरातफर व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीर आणि लखनौमध्ये गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. घाबरवून टाकल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगितले आणि कोणाशीही बोलू नये किंवा व्हिडिओ कॉल बंद न करण्याची धमकी दिली.
दरम्यान, पोलिस गणवेशात असलेल्या आरोपींनी तक्रारदाराच्या बँक खात्यांची व गुंतवणुकीची माहिती घेतली. त्यानंतर तक्रारदाराची ११ लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट मोडायला लावून, ती रक्कम एका खाजगी कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करायला भाग पाडले. सायबर कक्षात जाऊन माहिती घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पारमेश्वर धांडे करत आहेत.
रत्नागिरीतही असाच प्रकार उघडकीस…
वारंवार फोन करून आतंकवादी सहभाग, बँक खात्यामध्ये २ कोटींचे मनी लॉन्ड्रिग झाले आहे, असे सांगून आणि नाशिक पोलिस असल्याचे भासवून २५ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२६ या कालावधीत तालुक्यातील जयगड-साखरी बौद्धवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादी सुधाकर लक्ष्मण जाधव (वय ६१, रा. जयगड, साखरी बौद्धवाडी, रत्नागिरी) यांना अनोळखी तिघांनी वारंवार फोन करून नाशिक पोलिस असल्याचे भासविले. त्यांचा आतंकवादी हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : NPCI ने जारी केला अलर्ट, ‘Digital Arrest’ स्कॅमपासून सावध राहा! या कॉल्सना उत्तर दिल्यास होईल मोठं नुकसान






