रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विश्वासघात करत रूममेटने तिचे कपडे बदलतानाचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून ते आपल्या मित्राला स्नॅपचॅटद्वारे पाठवले. हा प्रकार १८ जानेवारी रोजी घडला असून, १९ जानेवारी रोजी तो उघडकीस आला. ही घटना एमजीएम कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घडली.
याप्रकरणात २३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही एम.जी.एम. कॉलेजमध्ये बायोमेडिकल अभियांत्रिकी तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती कॉलेजच्या हॉस्टेलवर प्रेरणा (नाव बदलेले) हिच्यासोबत राहते. १९ जानेवारी रोजी सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर दोघीही हॉस्टेलवर परतल्या. त्यावेळी प्रेरणा ही आपल्या मित्रासोबत फोनवर बोलताना फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले, हॉट आहेत का? असे बोलत असल्याचे पीडितेला संशय आला. रात्री दहाच्या सुमारास पीडितेने प्रेरणाकडे तिचा फोन मागितला. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र, नंतर फोन तपासल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला.
हेदेखील वाचा : Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
प्रेरणाने 18 जानेवारी रोजी पीडिता ही रूममध्ये कपडे बदलत असताना तिचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण करून ते आपला मित्र स्वराज धालगडे याला स्नॅपचॅटद्वारे पाठवल्याचे समोर आले. यानंतर पीडितेने प्रेरणाला स्वराजला फोन लावण्यास सांगून स्वराजला या प्रकाराचा जाब विचारला. त्यावर प्रेरणानेच फोटो पाठवल्याचे त्याने कबूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आत्महत्या करण्याची धमकी
या प्रकारानंतर प्रेरणाने पीडितेकडे माफी मागितली. मात्र, पीडितेने तत्काळ प्रेरणाच्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ते हॉस्टेलमध्ये आल्यानंतर, त्यांच्या समोरच प्रेरणाने पीडितेला धमकी दिली की, जर पोलिसांत तक्रार दिली तर ती आत्महत्या करेल आणि त्याला तू जबाबदार राहशील. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार






