Photo Credit- Social Media डोंबिवलीत भाजपच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम परिसरात शनिवारी रात्री भाजपच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतभेद टोकाला गेल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. या वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस या सदर घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम येथील राजूनगर याठिकाणी व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे कार्यालय आहे. शनिवारी रात्री विकास म्हात्रे काही कामासाठी देशमुख यांच्या कार्यालयात गेले होते. त्याच वेळी मेघराज तुपांगे हेदेखील तेथे पोहोचले. त्याचवेळी म्हात्रे आणि तुपांगे यांच्या पोलीस अंगरक्षकांमध्ये वाद झाला.
Ahmednagar Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुरूंग? बड्या नेत्याने घेतली राम शिंदेंची भेट
या वादानंतर विकास म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन तुपांगे गटाविरोधात तक्रार दिली. त्यावर पोलीस अंगरक्षकाच्या निवेदनानुसार अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. पण त्याचवेळी दुसरीकडे राजूनगरमधील खंडोबा मंदिराजवळ म्हात्रे समर्थक आणि तुपांगे समर्थकांमध्येही वादाची ठिणगी पडली आणि त्याचे नंतर राड्यात रुपांतरित झाले.
विकास म्हात्रे म्हणाले की, “देशमुख यांच्या कार्यालयात गेलो असता तुपांगे यांनी माझ्या पोलीस अंगरक्षकाला अपशब्द वापरले. आम्ही त्याबाबत माहिती देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो. पण त्यावेळीही तुपांगे यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. उद्या माझ्या जीवितालाही धोका असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
तर, ‘ राडा झाला त्याठिकाणी आपल्यालाही धमकी देण्यात आली. मी कार्यालयातून बाहेर पडत असताना विकास म्हात्रेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तलवार, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन सुमारे दहा ते पंधरा जणांनी आमच्यावर हल्ला चढवला,” असा आरोप तुपांगेंकडून करण्यात आला. आमच्यावर झालेल्या हल्ल्यात माझ्या गळ्यातील चैनही चोरली गेली. हे सर्व निवडणुकीतील वैमनस्यातून करण्यात आले. माझी काहीही चूक नसतानाही माझ्यावर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,” असाही दावा तुपांगेंकडून करण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींच्या आधारे परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत. मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात मेघराज तुपांगे, विशाल म्हात्रे आणि शत्रुघ्न मढवी हे तिघे जखमी झाले आहेत. याशिवाय अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे आणि अशोक म्हात्रे यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.