माणुसकीला काळीमा! महिलेला साखळदंडाने बांधून ४० दिवस घरात डांबलं; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
कोल्हापुरातील राजारामपुरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल ४० दिलस साखळदंडाने बांधून घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळदंड घालून कुलूप लावण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरातील दौलतनगर भागात हा प्रकार घडला आहे. दौलतनगर भागात दोन मजली घर आहे. या घरात गेल्या ४० दिवसांपासून सारिका साळी यांनी कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. दरम्यान पोलिसांनी आज अचानक त्या घरावर धाड टाकली आणि महिलेची मुक्तता केली. पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून कुलूप लावण्यात आले होते. ‘भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवलं होतं. त्यांनी मला चांगल्यासाठी बांधून ठेवलं होतं.’ असं पीडित महिलेने सांगितलं.
‘महिलेच्या घरातील सर्वजण रोज कामासाठी बाहेर जातात. सदर महिला वेडसर आणि अपंग आहे. घरातील सर्वजण बाहेर गेल्यावर दगडं मारणे, बडबडणे असं कृत्य करते, त्यामुळे कुटुंबियांनी वैतागून तिला बांधून ठेवलं होतं, असं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितलं.
दरम्यांनी पोलिसांनी महिलेची सुटका रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला संजय पवार यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत जाब विचारला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्याची सुटका केली.