मावळमध्ये अवैध धंदै वाढले असून याला पोलिसांकडून अभय मिळत असल्याची खंत व्यक्त होत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maval Crime News : वडगाव मावळ: सतिश गाडे : मुंबई-पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती तसेच पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मावळ तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणारे अवैध व्यवसाय पाहता संबंधित विभागांचे दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक अभय दिले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (Pune News)
पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या अनेक हॉटेल, ढाबे, बार तसेच आडमार्गाने सुरू असलेल्या ठिकाणी बेकायदेशीर मद्यविक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने मद्यविक्री होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे.
एकीकडे मावळ तालुक्यात एमआयडीसी, रिंग रोड, मोठे औद्योगिक प्रकल्प आणि नामांकित कंपन्यांची गुंतवणूक वाढत आहे; मात्र दुसरीकडे गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे जाळेही तितक्याच वेगाने विस्तारत आहे. तालुक्याच्या विकासाला काळिमा फासणाऱ्या या प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
हे देखील वाचा : पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली; दररोज ५४ बस ब्रेकडाऊन, प्रवाशांचे हाल
मावळ तालुक्यात डान्सबार, एमडी पावडर, गांजा, हातभट्टी, जुगार अड्डे, अवैध वेश्या व्यवसाय अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेले हे व्यवसाय पाहता प्रशासनाची भीती उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोणावळा-खंडाळा, तळेगाव एमआयडीसी, वडगाव मावळ, कामशेत, सोमाटणे, कुसगाव, कार्ला परिसर यांसह अनेक भागांमध्ये अवैध धंद्यांनी पाय पसरले असून युवक वर्ग या विळख्यात अडकत असल्याची गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
मावळ तालुक्यात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था नव्याने उभ्या राहत असून डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल ग्रुप, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांसारख्या बड्या संस्थांनी विविध अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
हे देखील वाचा : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात ‘इतके’ उमेदवार रिंगणात
त्यामुळे शिक्षणासाठी राज्यासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मावळमध्ये दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत वाढणारे अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर बार आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शिक्षणनगरी म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या मावळची प्रतिमा अशा प्रकारांमुळे मलीन होत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग फक्त दिखाऊ कारवाया करून वेळ मारून नेत आहेत; मात्र मुख्य सूत्रधारांवर हात टाकण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे “या अवैध धंद्यांना नेमके संरक्षण कोणाचे?” असा थेट सवाल जनतेतून विचारला जात आहे.
मावळ तालुक्याची शांतता, संस्कृती आणि सामाजिक प्रतिमा जपायची असेल तर प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करावे, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही आता दिला जात आहे.






