सौजन्य - सोशल मिडीया
पुणे/अक्षय फाटक : कोथरूड येथील एका बांधकाम व्यावसायिकावर तरुणीवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वत:चा घटस्फोट झाल्याचे सांगून त्याने अत्याचार केल्याचे म्हंटले आहे. तर या पीडितेचा बळजबरीने गर्भपातही केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी सुमेघ अरूण देवधर (वय ४३, रा. कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.
कोथरूडमधील एका क्लबमध्ये २०२२ मध्ये तरुणीची सुमेधसोबत ओळख झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता मुलगी संबंधित क्लबमध्ये नोकरीला होती. क्लबमध्ये सुमेघ जात होता, जाण्यापुर्वी तो तरुणीला फोन करून टेबल बुक ठेवा, असे सांगत होता. त्यातून त्यांची ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री व मैत्रीनंतर प्रेमात रुपांतर झाले. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सुमेघने पीडितेला रात्री भेटायला बोलवले व तिला तो रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेव्हा त्याने मी घटस्फोटीत असून, मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली.
त्यामुळे पीडितेने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, सुमेघने माझा बिझनेस थोडा सेट होऊ दे, माझे आई-वडील व्यवसायामुळे माझ्यावर चिडून आहेत, मी त्यांच्या मनाविरूद्ध लग्न केले तर मला ते प्रॉपर्टीतून काढून टाकतील, माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करीन असे आश्वासन दिले. नंतर कोथरूडमधील रुग्णालयात नेत गर्भपात केला. यानंतरही वारंवार शरीरसंबंध ठेवले.
दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी पीडिता व सुमेध त्याच्या ऑफिसमध्ये असताना त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला. तो फोनवर महिलेशी भांडत होता. तेव्हा पिडीतीने विचारले असता सुमेघने पत्नीसोबत बोलत होतो असे सांगितले. यामुळे पीडितेला धक्का बसला. पीडिता जाब विचारण्यास पुन्हा आरोपीच्या ऑफिसवर गेली असता देवधरच्या ड्रायव्हरने, तु आमच्या साहेबांना त्रास दिलास तर तुझा जीव घेईन, तुला जर गाडीखाली उडवून दिले तर कळणार नाही असे म्हणत धमकी दिली. तसेच आरोपी देवधर याच्या पत्नीनेही शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हंटले आहे.