संग्रहित फोटो
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुविख्यात गुंड गजानन मारणेच्या मंडळाने काढलेल्या मिरवणूकीत एका निरपराध तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत तरुण गंभीररित्या जखमी झाला असून, यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत तिघा अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौक येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूण मयूर कॉलनीत राहतो. तो आयटी कंपनीत नोकरी करतो. शिवजयंतीनिमित्त बुधवारी कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे तरूण घरीच होता. दुपारी चारच्या सुमारास तो दुचाकीवरून भेलकेनगर परिसरात आला. तेथून पुन्हा घराकडे येत असताना भेलकेनगर चौकातून ‘मारणे टोळी’तील काहींनी काढलेली मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत मारणे टोळीचा प्रमुखही उपस्थित होता. दरम्यान, तरुण मिरवणुकीच्या समोरून वाट काढत दुचाकीने पुढे गेला. त्याचा राग मात्र, मिरवणूकीतील तरुणांना आला. तीन ते चार जणांनी पळत जावून तरुणाला थांबवले, शिवीगाळ केली.
‘गाडी हळू चालवता येत नाही का, धक्का का दिला’ असे म्हणून त्याला मारहाण केली. एकाने तरुणाच्या नाकावर जोराने ठोसा मारला. नंतर त्याला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी व कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. मारहाणीनंतर टोळक्याने तेथून पळ काढला. तक्रारदाराने स्वत:ला सावरत वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि ते दोघे कोथरूड पोलिसांत गेले.
कोण आहे गजा मारणे?
पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत व तो तुरुंगवास भोगून आलेला आहे. हा गुंड अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतो. अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली होती. 3 वर्षे या प्रकरणाचा खटला सुरु होता. मात्र, सबळ पुराव्या अभावी गजा मारणे याची सुटका झाली. मात्र जेलमधून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढत त्याचा स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तत्कालीन गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच 20 कोटीच्या खंडणीसाठी केलेले अपहरणाचा आरोप देखील गजा मारणेवर आहे. त्याच्यावर यामुळे मोक्का कारवाई करण्यात आली आहे. मारणे टोळीवर आत्तापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले असून 8 वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.