संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
नितीन बालाजी सुर्यवंशी (रा.मु. पो. हेळंब, तालुका देवणी, जिल्हा लातुर) असे बोगस जवानांचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय 23, रा. नागराळ, तालुका – मुखेड, जिल्हा नांदेड गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2024 रोजी ते आज रोजी पर्यंत सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन कॅप परिसर येथे घडला आहे. यामध्ये फिर्यादीची 1 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली.
दाखल फिर्यादीनुसार, भरत महाटे हे शेती करतात. तसेच लष्कर भरती व पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नितीन सुर्यवंशी हा 13 ऑगस्ट 2024 मध्ये उदगीर रेल्वे स्टेशन येथे भेटला. त्यावेळी त्याने त्यांना आर्मीमध्ये असून तो आर्मी मध्ये मुलांना भरती करतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी नितीन याने फिर्यादीला सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन येथे भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने आर्मीचा युनिफॉर्म परिधान केला होता. त्याच्यात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्याने फिर्यादीला एका महिन्यात आर्मी मध्ये नोकरी लावून देतो त्यासाठी दोन लाख रुपये लागतील असे सांगितले. फिर्यादीनेही यावर विश्वास ठेवला. त्याला वेळोवेळी 1 लाख 75 हजार रुपये दिले.
19 जानेवारी 2025 रोजी एक लाख रुपये रोख सब एरीया कैंटीन येथे दिले. त्यावेळी त्याने फिर्यादीला मार्चमध्ये जॉईनिंग होईल असे सांगितले. त्यांनतर वारंवार फोन करुन कधी जॉईनिंग होईल असे विचारले असता तो फिर्यादीचे फोन टाळत होता. म्हणून फिर्यादिला नितीन बालाजी सुर्यवंशीवर संशय आल्याने सदर्न कमांड पुणे येथे जावून खात्री केली असता नितीन बालाजी सुर्यवंशी नावाचा व्यक्ती त्याठिकाणी नेमणुकीस नसल्याचे तक्रारदारांना समजले. नितीन बालाजी सुर्यवंशी याने नोकरी लावतो म्हणुन 1 लाख 75 हजार 550 रूपये घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली आहे. अशी बरीच जणांची फसवणूक झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.