संग्रहित फोटो
पुणे : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना पाच लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रवींद्र जनार्दन बिलाडे (वय २३, रा. बोरकुल, धुळे ) याने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोहित रामसिंग धामी (रा. उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिलाडे याची एका त्रयस्त व्यक्तीमार्फत गेल्या वर्षी धामी याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी धामीने लष्करी रुग्णालयात नोकरी करत असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे यांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष धामीने दाखविले. नंतर धामीने बिलाडेकडून दोन लाख ८० हजार रुपये घेतले, तसेच त्याचा मित्र रोकडे याच्याकडून दोन लाख रुपये घेतले.
दोघांनी त्याला एकूण मिळून चार लाख ८० हजार रुपये दिले. नंतर दोघांनी त्याच्याकडे लष्करातील नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिलाडेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक निरीक्षक मोहिते अधिक तपास करत आहेत.
मनीलॉन्ड्रींगच्या धाकाने सहा लाख उकळले
मगरपट्टा येथील एका तरुणीला आधार कार्डचा गैरवापर करून त्याद्वारे मनी लॉन्ड्रींग झाले आहे. यामुळे यात तुम्हाला अटक करावे लागेल असे सांगून सायबर चोरट्यांनी तरुणीकडून 8 लाख 89 हजार रुपये उकळले आहेत. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने मनीलॉन्ड्रींग झाले असून, आधार कार्डचाही गैरवापर करण्यात आला आहे. तुम्हाला अटक होऊ शकते असे धमकावून केस क्लिअर करण्यासाठी एनओसी सर्टीफिकेट देतो असे सांगून तरुणीकडून 5 लाख 89 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमर काळंगे करीत आहेत.
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.