फोटो सौजन्य: गुगल
कर्जत/ संतोष पेरणे : लग्नासाठी जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाईन वेडींग साईट्सना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र हेच आता फसवणुकीचं कारण होत आहे. ऑनलाईन वेडींग साईटवरुन एका महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करण्याचं आमीष दिलं जात असल्याचं उघड झालं आहे. त्याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतिक संजय देवरे याला ताब्यात घेतले.
कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासावर भर देऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. नाशिक येथे राहणारा 37 वर्षीय प्रतीक संजय देवरे याने ऑनलाईन पद्धतीने महिलांशी ओळख वाढवायचा. जीवनसाथी डॉट कॉम या वेडींग वेबसाईटवरून ओळख करून तिचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रतिक देवरे हा तरुण त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवायचा.
या तरुणाने आपल्या अमरावती येथे बिअर शॉप विकत घ्यायचे असल्याचे एका तरुणीला सांगितले. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून, संबंधित तरुणीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि एच डी एफ सी आदी बँकेतील खात्यातून एकूण सात लाख रुपये फोन पे आणि जी पे तसेच स्वतःच्या ऍक्सेस बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. तसेच, रोख स्वरूपात 90 हजार रुपये घेत एकूण 7.90 लाख रुपये प्रतिक देवरे या देण्यात आले होते.मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी 6 फेब्रुवारी 2025 रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 32/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318 (4) म्हणजेच 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुनकर यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सर्व बाबींचा तांत्रिक तपास केला.त्यानंतर सापळा रचून पकडले असून शनीवारी कर्जत येथे आणले.या गुन्हेगाला पोलीसांनी अटक केली आहे.
तपासादरम्यान उघडकीस झाले असून या आरोपीने महाराष्ट्रभर विविध महिलांना जीवनसाथी आणि इतर विवाह वेबसाईट्सद्वारे फसवले आहे. अशा वेबसाईट्सवर तो महिलांशी जवळीक साधत, विश्वास संपादन करत आणि आर्थिक फसवणूक करत होता. त्यामुळे याच्या विरोधात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.
सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून महिलांनी अनोळखी व्यक्तींशी जपून वागावे आणि विश्वास ठेवल्यापूर्वी योग्य तपासणी करावी, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे. लग्न जुळवण्यासाठी असलेल्या या ऑनलाईन वेडींग साईट्सच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.