संग्रहित फोटो
पुणे : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर पैसे निघत नसल्याची बतावणी करून त्यांचे एटीएम कार्ड आदला-बदली करून रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा खडकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यात टोळीने अनेक ठिकाणी एटीएम कार्ड बदलाबदल करुन नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. हे चोरटे चोरी करण्यासाठी विमानाने पुण्यात येत होते.
सावेज सलीम अली (वय ३०, रा. लोणी गाझियाबाद, उत्तर प्रदेश), नियाज इजाज मोहम्मद (वय २९, रा. लोणी गाजियाबाद) अशी या चोरट्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांच्या पथकाने केली आहे.
खडकीतील एका एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यास गेलेल्या ६९ वर्षीय संजय गोपीनाथ कदम यांना पैसे काढत असताना त्यांना पैसे काढून देतो, असे सांगून एटीएम कार्डची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्यावर आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याकडील कार्ड घेऊन ते पळून गेले. नंतर दुसरीकडे विविध ठिकाणावरुन त्यांच्या खात्यातील १ लाख ४ हजार ६५० रुपये काढून घेतले होते.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास खडकी पोलीस करत होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवरून माग काढला जात होता. तेव्हा माहिती मिळाली की, आरोपी मुळचे उत्तर प्रदेशातील असून विविध शहरात फिरतात. सध्या नाना पेठेतील एका लॉजमध्ये ते थांबलेले आहेत. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. ते लॉजमध्ये असल्याची खात्री होताच पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी करण्यास ते विमानाने प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून ६९ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यांनी इतरही ठिकाणी अशाच प्रद्धतीने चोऱ्या केल्याचे ते सांगतात.
हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्यांचा नवा डाव; डिजीटल ॲरेस्टची भिती दाखवली अन्…