पत्नीचा खून करून वकील पोलीस ठाण्यात हजर
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. त्यातच सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली. वकील पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या गंभीर अशा घटनेने एकच खळबळ उडाली.
वसंत विहार परिसरातील स्वराज विहारमध्ये घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वकिलाने पत्नीचा चाकूने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३९, रा. मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या रा. स्वराज विहार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मृत भाग्यश्री यांचा भाऊ रत्नदीप विद्याधर भोसले (वय ३७, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत रवींद्र राजहंस (वय ४४, रा. मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या रा. स्वराज विहार) याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur Crime News : कोल्हापूर हादरलं! डोके, दोन्ही हातपाय धडापासून वेगळे केले आणि…..; काय घडलं नेमकं?
आरोपी प्रशांत राजहंस वकिली करतो. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास राजहंस हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतः हून हजर झाला व त्याने आपण आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.
पत्नीशी भांडण झाल्याचे सांगितले
पत्नी भाग्यश्री हिच्याशी भांडण झाल्याने त्यांनी चाकूने तिच्या गळ्यावर वार केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. त्यावेळी भाग्यश्री या जखमी आणि बेशुद्धावस्थेत बेडरूममधील बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी बेशुध्दावस्थेतील भाग्यश्री यांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याने राग
याची माहिती पोलीस हवालदार प्रवीण चुंगे यांनी भाग्यश्री यांचा भाऊ रत्नदीप यास फोनवरून दिली. त्यानंतर रत्नदीप भोसले यांनी स्वराज विहार येथे राजहंस यांच्या घरी जाऊन पाहणी केली. रत्नदीप यांची बहीण भाग्यश्री या मंगळवेढा येथे राहण्यास न गेल्याने व प्रशांत राजहंस यास घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून प्रशांत याने पत्नी भाग्यश्री हिच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार करून तिचा खून केला, अशी फिर्याद रत्नदीप भोसले यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे.