खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये विधान परिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधान परिषदांच्या 10 जागांसाठी ही निवडणूक होणार असून यामध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महायुतीवर निशाणा साधला असून महाविकास आघाडीच्या रणनीतीवर भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. आगामी विधान परिषदांच्या निवडणुकांबाबत हालचालींना वेग आला आहे. येत्या ३० एप्रिलला अर्ज दाखल केला जाणार आहे. महाविकासआघाडीकडून अद्याप कोण विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झालेले नाही. याबाबत आता खासदार संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेवर जाण्याबद्दल उद्धव ठाकरे नक्की भूमिका स्पष्ट करतील. यासाठी उमेदवारी अर्ज भरावाच लागेल, तेव्हा तुम्हाला आमंत्रित करू. सर्व व्यवस्थित होणार आहे, तुम्हाला पेढे मिळतील, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? मतदानानंतर ‘पोल पंडित’चा कौल महायुतीच्या बाजूने
यावर माध्यमांनी कोणाच्या नावाचा पेढा खायला मिळणार असा प्रश्न केला. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, ते नाव तुम्हाला नक्की कळेल. अनेक लोकांचे नाव पेढे वाटायचे आहेत. भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट सर्वांचे पेढे तुम्ही खा. आमच्याच पेढ्यावर तुमचं लक्ष का? असा मिश्किल सवाल करत खासदार संजय राऊत यांनी खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : “भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी..; छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने रोहित पवारांचा संताप अनावर
विधान परिषदेच्या मतदानावर देखील खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भाजपची मतंही फोडू शकतात. अमित शाहांनी घडवलेला तो इतका मोठा माणूस आहे. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात. ते सुपरपॉवर आहेत. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त होणार आहे. कोणीही कोणाचा नसतो. सर्व पैशांचे आहेत, असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेचा संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात केला. यावर उद्धव ठाकरेंनी कशाला बोलायला हवं? वर्षा बंगला सध्या कोणाच्या मालकीचा आहे? त्यांनी स्वतः खुलासा केला आहे, मग अजून आपल्याला काय हवं?, असे सांगत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.






