Ashok Kharat Sex Scandal: अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया
नाशिक : लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ललित पोफळे यांची सुमारे ८ कोटी ७६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात मध्यरात्री अशोक खरातविरुद्ध नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललित पोफळे हे खरातच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांना खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची पूर्ण कल्पना होती. याच गोष्टीचा फायदा घेत अशोक खरातने पोफळे यांना त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याची भीती घातली. हे संकट टाळण्यासाठी आणि अवतारपूजा करण्याच्या नावाखाली त्याने वेळोवेळी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले.
दरम्यान, ललित पोफळे यांची यापूर्वीही पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य आणि फसवणुकीच्या नेटवर्कबाबत अनेक महत्त्वाच्या माहिती समोर आल्या होत्या. पोफळे हे ट्रस्टचे महत्त्वाचे सदस्य राहिल्यामुळे, या नवीन गुन्ह्यामुळे खरातच्या आर्थिक घोटाळ्यांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी डॉक्टरच्या मदतीने करायचा गर्भपात
नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. सूत्रांनुसार, अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला खरात सरकारी डॉक्टरच्या नावाखाली गर्भपाताचे रॅकेटही चालवत होता. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांपैकी एकाने सरकारी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात करून घेतला होता.
मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी
कुडूवाडीत व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात कुडूवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.






