Crime News Live Updates
13 Sep 2025 12:55 PM (IST)
अकलुज येथील पीडित महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक व मानसिक छळ, धमक्या, बरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. या घटनेमुळे अकलुज, सातारा व रायगड परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी आरोपींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
13 Sep 2025 12:35 PM (IST)
शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.
13 Sep 2025 12:15 PM (IST)
मी सगळ्यांची नावं पोलिसांना दिली. कोणाला सुद्धा माझ्या लहान मुलाची दया आली नाही. लक्ष्मी आंदेकर ती पण आज्जीच आहे ना… पण कुणाला काहीच वाटलं नाही का? वृंदावनी वाडेकरच्याच घरी सगळे असतात. सोनाली वनराज आंदेकरला देखील अटक करा. तिची मुलगी देखील माझ्याऐवढीच आहे. तिला पण माझ्या वेदना कळायला हव्यात. तिला मामी असून देखील तिला कळकळ नाही आली, ऐवढी कठोर माणसं कशी असू शकतात, असं कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.
13 Sep 2025 11:55 AM (IST)
गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता आंग्रे वस्ती, सार्वजनिक रस्ता, लोणी स्टेशन परिसरात गणेश रावसाहेब गोडसे (वय २५, रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, मुळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) व त्याचा साथीदार अक्षय रवि पवार (रा. लोणी काळभोर) हे गांजा विक्रीसाठी थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी पाठलाग करून गोडसे याला पकडले.
13 Sep 2025 11:30 AM (IST)
दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे असे ७१ हजार ४०० रुपयांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. ओंमकार दीपक जाधव (वय २२, रा. साई सिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. ओंमकार जाधव याच्याविरुद्ध २०१६ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. ओंमकार मध्यप्रदेशात गेलेला असताना ही पिस्टल विकत घेतली असून, स्वत:च्या संरक्षणासाठी ही पिस्टल बाळगत असल्याचे ओंमकार जाधव याचे म्हणणे आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांनी दिली.
13 Sep 2025 11:10 AM (IST)
महाबळेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर माकडाने उडी मारल्याने दुचाकी घसरून अपघात झाला आहे. या अपघातात उपचारापूर्वीच एकाचा मृत्यू झाला आहे. आनंद सखाराम जाधव (वय : ५०, रा. देवळी) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद जाधव हे गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वरमधील आपली कामे उरकून पत्नीसोबत दुचाकीवरून देवळीला निघाले होते. तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली परिसरात दुचाकीवर माकडाने झडप मारली, यामुळे दुचाकीस्वराचा ताबा सुटला व तोल जाऊन जाधव हे पत्नीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, गंभीर जखमी अस्वस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात जाधव यांची पत्नी देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद गुरुवारी रात्री उशिरा झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळीसह परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप टाकल्याने हा अपघात झाला झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात कौटुंबिक वादाने टोकाचं रूप घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पत्नीच्या मामाचा, पतीनेच चाकूने वार करत खून केला. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत समद शेख हे आरोपी सुभान शेख यांच्या पत्नी सईदा शेख यांचे मामा होते. गेल्या काही दिवसांपासून सुभान आणि सईदा यांच्यात वारंवार वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी पत्नी सईदा घर सोडून माहेरी गेल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा साधण्यासाठी शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री नातेवाईकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान वाद शमण्याऐवजी चिघळत गेला आणि अचानक सुभान शेख याने चाकू काढून समद शेख यांच्यावर छाती, मान आणि पोटावर सपासप वार केले. याच दरम्यान, समद शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे सासरे जमील शेख यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात समद शेख गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले, तर जमील शेख यांना तात्काळ भुसावळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुभान शेख याला अटक केली आहे.