यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही (File Photo : Crime)
पुसद : शहरातील अखिरतनगर येथे उधारीचे पैसे मागणाऱ्याला व त्याच्या चुलत्याला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून, चौघा जणांविरोधात वसंतनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. मारहाणीची ही घटना आता समोर आली आहे.
सलमान बेग शमशेर बेग (वय 22, रा. अखिरतनगर, दुसरी गल्ली (वसंत नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हमीदिया मशीदजवळ राहणाऱ्या इमरान खान सरदार खान (वय 40), जावेद खान सरदार खान (वय 45) याच्यासह त्याच्या दोन अनोळखी साथीदार विरोधात गुरुवारी (दि. 6) गुन्हे दाखल झाले आहेत.
वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमरान खान हा सलमान खान याच्या घराजवळ राहणारी हसीना बी शमशेर शाह यांना उधारीवर दिलेले पैसे परत मागण्यासाठी घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आला होता. त्याचवेळी इमरान खान मोठमोठ्याने आवाज देऊन शिवीगाळ करीत होता. त्यानंतर इमरान खान व जावेद खान हे दोघेही जण सलमान बेग यांच्या घराजवळून निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळेत परत दोन्हीही आरोपींनी संगनमत करून इतर दोन अनोळखी व्यक्तीला घेऊन आला.
यावेळी सलमान बेग व त्याच्या चुलत्यासोबत वाद निर्माण केला. त्यानंतर चौघांनीही लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्यातही तरुणाला मारहाण
तर दुसऱ्या घटनेत, पुण्यात कौटुंबिक वादातून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वानवडीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र अनिल कवडे (वय ३६, रा. गंगा क्वीन सोसायटी, घोरपडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोज गायकवाड याच्यासह चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कवडे यांनी याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.