लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक (संग्रहित फोटो)
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी दिलेल्या निकालात आजन्म कारावास व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
मालेगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुण वैभव शालीकराम कन्हाळे याने ८ जून २०१९ रोजी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे पळवून नेले. त्यानंतर त्याने संबंध प्रस्थापित केले. ११ जून २०१९ पर्यंत दोघे कहाळवाडी येथेच होते. त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी ११ जून रोजी आपल्या गावी घरी परत आली.
हेदेखील वाचा : Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना
दरम्यान, घरी आल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन झालेल्या सर्व प्रकाराबाबत विचारणा केली असता, तिने सर्व घटनाक्रम सांगितला. ‘आपण दोघे लग्न करू’ असे, म्हणून कन्हाळे याने ८ जून २०१९ रोजी रात्री मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले. तसेच पुढील सर्व घटनाक्रम सांगितला. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तसेच मुलगी परत आल्यानंतर ११ जूनला सविस्तर माहिती दाखल केली.
आरोपीला शिक्षा
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व आरोपी पक्षाची बाजू एकूण घेतल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी कन्हाले यास विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावस व ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुचिता थी, कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
आधी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार
जऊळका पोलिस ठाण्यात प्रथम ८ जूनला मुलगी बेपत्ता असल्याची तसेच मुलगी परत आल्यानंतर ११ जूनला सविस्तर माहिती दाखल केली. या फिर्यादीवरून जऊळका पोलिस ठाण्यात आरोपी कन्हाळे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे व जऊळका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानुसार, आता आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.