File Photo : Accused Akshay Shinde
मुंबई : बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, अक्षय शिंदे वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल सादर करा,’ बदलापूर घटनेवरून उच्च न्यायालयाचे आदेश
आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अक्षयला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने अक्षय शिंदेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता अक्षयचा मोबाईल शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. एसआयटी प्रमुख आरती सिंह बदलापूर पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. आरोपी अक्षय शिंदे वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
शाळा प्रशासन मोकाट
अक्षय शिंदे याच्यासोबतच या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालय आदेशानुसार शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्याप संस्थाचालक फरार असून, पोलिसांच्या ते हाती लागलेले नाहीत.
अक्षय शिंदेचे बदलापूरमधील खरवई येथे घर
अक्षय शिंदे आपल्या कुटुंबासह बदलापूरमधील खरवई या गावात राहतो. तेथे त्याचे घर आहे. परंतु, घृणास्पद कृत्य केल्यानंतर त्याचा नाहक मन:स्ताप त्याच्या कुटुंबालाही सहन करावा लागत आहे. अक्षयच्या कुटुंबाला गावातून बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराला बाहेरून कुलूप होते. पण, लोकांनी घराच्या काचा फोडून आतील सामानाचीही तोडफोड केली. अक्षयचे नातेवाईकही अक्षयच्या शेजारी राहत होते. त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली.
हेदेखील वाचा : खाकीनेच खाकीचा केला घात! 8वी पास तोतया हवालदाराकडून 10 महिला कॉन्स्टेबलवर लैंगिक अत्याचार, ‘असा’ उघड झाला बनाव