CRIME(फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
मिरज येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने औषध देण्याच्या बहाण्याने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. ही घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
कविता समाधान आलदर (कोळे, ता.सांगोला, जि. सोलापूर) या महिलेची काही दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला होता आणि सध्या त्या बाळासह प्रसूती विभागात उपचार घेत होत्या. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना त्या ठिकाणी एक अनोळखी महिला रुग्णालयात आली आणि औषध डोस देण्याच्या कारणाने बाळाला घेऊन गेली. मात्र तासाभरानंतरही बाळ परत आले नाही, शोध शोध सुरू झाली. नंतर आलदर कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला दोन दिवसांपासून प्रसूती विभागात फिरत होती. ती विविध रुग्णांशी बोलून आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करत होती. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीचा उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिसांनी संशयित महिलेचे व्हिडीओ चित्रण जप्त केले असून, तिचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धावपळ केली. प्रशासनाकडून रुग्णांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
Cyber Crime: राज्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ; पिंपरीत एकाची तब्बल 17 लाखांची फसवणूक