मोखाडा पोलिसांची तडफदार कारवाई! अवघ्या 12 तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक
दीपक गायकवाड/ मोखाडा: पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केवळ १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करत उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, आता पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ नवसु फुफाणे (वय २० वर्षे, व्यवसाय शेती/मजुरी, रा. सातुर्ली, ता. मोखाडा, जि. पालघर) यांनी मोखाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादींचे वडील नवसु लाडक्या फुफाणे (वय ५५ वर्षे) हे घरी असताना आरोपी १) जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील (३१), २) रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील (२३), आणि ३) प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे (२५), सर्व रा. सातुर्ली, ता. मोखाडा यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
नवसु फुफाणे यांनी आरोपींना “शेताजवळील नदीपात्रात विषारी औषध टाकून मासे मारू नका” असे सांगितल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता. याच कारणावरून तिघांनी मिळून 6 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास नवसु फुफाणे व त्यांच्या मुलगा सोमनाथ यांना घरात येऊन शिवीगाळी, दमदाटी केली आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर नवसु फुफाणे यांना कास बांधून रस्त्याने ओढत नेले आणि गावात नेऊन पुन्हा निर्दयीपणे लाथाबुक्यांनी व लाकडांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर (जव्हार विभाग) यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास पथके गठीत करण्यात आली. सपोनि प्रेमनाथ ढोले, प्रभारी अधिकारी मोखाडा पोलिस ठाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कमी वेळात म्हणजेच अवघ्या १२ तासांत तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
मोखाडा पोलिसांनी दाखविलेली ही तत्परता आणि समन्वय हे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. या कारवाईबद्दल जिल्हा पोलिस दलात समाधान व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.