महिला पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात (Photo Credit - AI)
तक्रार दाबण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार महिलेच्या पतीने तिच्यासह तिच्या मित्राविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करण्यासाठी आणि त्यात मदत करण्यासाठी हवालदार लता दराडे हिने तक्रारदार महिलेकडे प्रत्येकी दहा हजार असे एकूण ₹२० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवली.
घरी बोलावून लाच स्वीकारली
एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सापळा रचण्यात आला. मात्र, हवालदार दराडे पोलीस ठाण्यात उपलब्ध न झाल्याने तक्रारदाराने त्यांना फोन केला. तेव्हा दराडे हिने तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन थेट स्वतःच्या घरी (गारखेडा परिसरात) बोलावले. तक्रारदार महिला आणि तिच्या मित्राकडून ₹२० हजारांची लाच स्वीकारताच, आजूबाजूला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पोलीस हवालदार लता दराडे हिला रंगेहाथ पकडले.
रक्कम आणि मोबाईल जप्त
आरोपी लता दराडे हिच्या अंगझडतीदरम्यान ₹२० हजार रुपयांची लाचेची रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचा मोबाईल सील करून त्याचे विश्लेषण व डिजिटल तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, तिच्या घरातील झडतीची पूरक कारवाईही सुरू आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कागणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपाधीक्षक सुरेश बाळासाहेब शिंदे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली.






