सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : पुणे शहरातील प्रगतीनगर याठिकाणी अनिकेत सदाशिव गजाकस (वय २३) या युवकाचा कोयत्याने वार करुन निर्घृण खून केल्या प्रकरणातील तिघांना १२ तासाच्या आत पोलीसांनी सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. माळशिरस) येथून पाठलाग करुन जेरबंद केले.
दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अभिषेक सदाशिव गजाकस याचा भाऊ अनिकेत सदाशिव गजाकस हा बारामती मधील प्रगतीनगर क्रियेटिव्ह अॅकॅडमी कडुन टिसी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवरुन जात असताना यातील आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (वय १९ वर्षे, रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी, बारामती ), महेश नंदकुमार खंडाळे (वय २१, रा यदुपाटीलनगर तांदुळवाडी, बारामती), संग्राम दत्तात्रय खंडाळे (वय २१, रा शेळकेवस्ती तांदुळवाडी, बारामती) यांनी मोटार सायकलवर येऊन अनिकेत यास नंदकिशोर पंजाबराव अंभोरे याच्या आते बहिणीसोबत बोलण्याच्या कारणावरुन हातातील कोयत्याने त्याच्यावर वार करुन त्याचा खून केला.
या प्रकाराबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच सदर ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पोहचले त्यांनी तात्काळ सदर गुन्हयाचा शोध सुरु करुन फिर्यादी अभिषेक सदाशिव गजाकस याच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सदर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी देऊन मार्गदर्शन करुन तपास सुरु केला. सदर गुन्हयातील आरोपी हे सदरचा गुन्हा करुन फरार झाले होते. सदर गुन्हयातील आरोपींचे मोबाईल नंबर मिळवून त्यांचे सीडीआर काढून गुप्त बातमीदारामार्फत आरोपींची माहिती काढून सदर आरोपींनी विनाविलंब सोलापुर जिल्हयातील अकलुज खंडाळी येथून शिफातीने पकडून सदर आरोपींना काल दिनांक २० डिसेंबर रोजी अटक केली आहे. त्यादरम्यान आरोपींकडून सदर गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदिप संकपाळ व टिम बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत व त्यांची टिम यांनी सदर गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी कलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास गजानन चेके हे करीत आहेत. दरम्यान या पथकातील पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : कांद्याने केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; दरात मोठी घसरण
कोयता विकणाऱ्यावर देखील करवाई
या घटनेत आरोपींनी ज्या व्यक्तीकडून कोयता विकत घेतला होता, त्या व्यक्तीची देखील चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी सांगितले.