संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाखो रुपये उकळणार्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी स्वतः महसूल सचिव असल्याचे सांगत होता. आरोपीला बनावट नियुक्तीपत्रे बनवून देण्यात पुणे महसूल कार्यालयातील सहायक क्लार्कचा सहभाग निष्पन्न झाले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महादेव बाबुराव दराडे (३२, रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजीत लक्ष्मण चौरे (३५, रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील चौरे हा पुणे महसूल कार्यालयात सहायक क्लार्क म्हणून कामाला आहे. एका २२ वर्षीय तरूणाने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून दराडे याच्यावर १० लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, नागेश राख यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
दराडे हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात ये- जा असल्याने तो अनेकांना महसूल सचिव असल्याचे सांगत होता. तक्रारदार तरुणाची एका त्रयस्त मित्राच्या माध्यमातून दराडे याच्याशी ओळख झाली. नंतर दराडेने तरूणाचा विश्वास संपादीत केला. तरूणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देतो, असे सांगून २०२२ ते २५ या तीन वर्षात वेळोवेळी दहा लाख रूपये घेतले. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता.
दरम्यान दराडेला पथकाने अटक केली. त्याची चारचाकी गाडी तसेच वाकड येथील घरातून पोलिसांना बनावट कागदपत्रे सापडली. अनेक नियुक्तीपत्रे, लेटरपॅड, शिक्के मिळाले आहे. यापद्धतीने दराडे याने राज्यातील पंधरा ते वीस जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात दराडे याला चौरे हा बनावट नियुक्तीपत्र बनवून देण्यात मदत करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार पोलिसांनी चौरे यालाही अटक केली.
२० ते २५ जणांच्या फसवणूकीची शक्यता
दराडे याने महसूल सचिव अशी ओळख सांगून राज्यभरातील २० ते २५ जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक शक्यता आहे. त्याच्याकडून पोलीस, वन आणि महसूल विभागाचे बनावट नियुक्तीपत्रे, शिक्के, लेटरपॅड आदी कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपींकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात त्याने अशाप्रकारे राज्यातील आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसाशी संपर्क करावा.
– प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, युनिट दोन.