संग्रहित फोटो
सातारा : निमसोड तालुका खटाव येथे पोलिसांनी बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून जवळजवळ रोख रक्कम आकरा हजार पाचशे रुपये जप्त केले असून, पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की निमसोड येथे होळीचांगाव रोड लगत बंद पडलेल्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये बेकायदेशीर रित्या जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना समजली त्यानुसार वडूज पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील पत्त्याची पाने व रोख रक्कम असा ऐवज जप्त केला आहे.
या ठिकाणी दारू, गुटखा, मटका असे अनेक अवैध व्यवसाय सुरू असून, बऱ्याच वेळा पोलीसही याकडे काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत तक्रारीही होत असतात परंतु किरकोळ कारवाई करून पोलीस अशांना सोडून देत असतात त्यामुळे अशा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावत असते.
निमसोड येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी काही तास अगोदर जवळजवळ ४० ते ५० लोक जुगार खेळत असल्याची माहिती आहे परंतु ज्यावेळेला पोलिसांनी दुपारी साडेचार च्या दरम्यान कारवाई केली त्यावेळी मात्र पाच ते सहा जणच सापडले असल्याचे पोलिसांनी कारवाईत दाखवले आहे याचा अर्थ असा होतो की या व्यवसायातील काही लोकांचे पोलिसांशी सख्य असून कारवाई होणार असल्याची बातमी अगोदरच अशा लोकांना समजते की काय असा प्रश्न निर्माण होतो.
सध्या सगळीकडे आचारसंहिता चालू असून, भागात चालू असणाऱ्या अवैध व्यवसायाला चाप बसवण्याची गरज असल्याचे लोकांच्यात बोलले जात आहे. या गुन्ह्याची नोंद मायणी येथे झाली असून, याचा अधिक तपास नाना कारंडे करीत आहेत. अशाच प्रकारची कारवाई गेल्या काही दिवसापूर्वी कलेढोण येथे झाली होती त्यामध्ये काही लोकांच्या वर गुन्हा दाखल झाला होता परंतु अशा कारवाईबाबत लोकांच्यात नेहमीच संभ्रमावस्था राहिलेले असून, अशा गुन्ह्यात पोलीस हे या व्यवसायिकांना अभय देत असल्याची चर्चा होत आहे निमसोड, मायणी, कलेढोण, या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक अवैध व्यवसाय सुरू असून याकडे पोलीस प्रशासन मात्र सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहे.
दोनच दिवसांपूर्वी निमसोड येथे श्री सिद्धनाथाची यात्रा पार पडली. या यात्रेसाठी बाहेरून मुलांच्यासाठी पाळणे इतर करमणुकीचे साधने घेऊन आलेल्या लोकांच्याकडूनही मायणी येथील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी हप्ता मागितला असल्याची खात्रीलायक वृत्त आहे याचा अर्थ असा होतो की इकडे राजरोसपणे दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय सुरू असतात यांच्याकडे मात्र डोळेझाक होते परंतु गोरगरीब लोक पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी चार रुपये कमावण्यासाठी व्यवसाय करत असतात त्यांच्याकडून मात्र हप्ता मागितला जातो ही अत्यंत खेदाची बाब आहे.