वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणावळा उपविभागातील सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार आणि रेस्टॉरंट चालकांवर मध्यरात्री धडक कारवाई करण्यात आली आहे. कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बारवर छापे मारून, बार चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या दोन्ही ठिकाणी पोलीस पथकाने छापे टाकले आहेत. बार चालक विहित वेळेपेक्षा अधिक काळ व्यवसाय चालू ठेवून ग्राहकांना खाद्यपदार्थ, मद्य विक्री करत होते. तसेच ऑर्केस्ट्रा आणि संगीत कार्यक्रम सुरू असल्याचे आढळून आले. दोन्ही बार चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यू) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कामशेत येथील कारवाईचा तपास कामशेत पोलीस स्टेशन करत आहेत तर वडगाव मावळमधील प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशन हाती घेत आहे.
हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांचे विद्युतपंप चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह केली. सदर कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नियमभंग करणाऱ्या व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. लोणावळा उपविभागात नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे संकेत पोलीस विभागाने दिले आहेत.
जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई
लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे बंद केले आहेत. पोलिसांनी एकूण तीन मटका अड्ड्यांवर छापा टाकून ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच सहा हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्या ताब्यातील चौदाशे रुपयांच्या चाळीस मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये किरण राजु जाधव (वय ३२ वर्षे,) विकास भिमाजी पैलवान (वय ३२, दोघे रा. गवळीवाडी लोणावळा), वैभव भगवान साठे (वय २५ वर्ष ,रा. ओळकाईवाडी, कुसगाव ता. मावळ जि.) आणि अशोक जगन्नाथ फाळके (रा.आण्णाभाऊ वसाहत सिद्धार्थनगर, लोणावळा) या चौघांना तीन वेगवेगळ्या अड्ड्यावर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना ताब्यात घेतले. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.