सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील विद्युत पंप चोरणारी टोळी जेरबंद करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी सहा सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्हयातील एकूण ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे जिरायती भागात शेतातील विहीरीवरील विद्युत पंपाच्या चोरीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.
बारामती तालुक्यातील लोणीभापकर, सायंबाचीवाडी गावच्या हददीतील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील विद्युतपंप चोरीचे प्रकार वाढीस लागल्याने शेतकरी हैराण झाले होते, त्याचबरोबर शेतातील पिके ही धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तौफीक मणेरी, भाउसो मारकड यांनी गोपनीय माहीती काढत आरोपींची माहिती मिळविली.
आरोपी ओंकार राजेश आरडे (वय २५), महेश दिलीप भापकर (वय ३१)अमोल लहु कदम (वय २८) निलेश दत्तात्रय मदने (वय २८ ) प्रथमेश जालिंदर कांबळे (वय २२ सर्वजण रा. लोणी भापकर ता. बारामती जि. पुणे ) यांना ताब्यात घेवून चौकशी केली. तसेच गोपनीय माहीती व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी विद्युतपंप चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी कालीदास शिवाजी भोसले (वय–४२ रा. लोणी भापकर) यास चोरी केलेले विद्युत पंप विक्री केल्याची कबुली दिली. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विद्युतपंप चोरीचे १७ गुन्हे उघड
विद्युतपंप चोरीचे १७ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्यांच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, चोरी उघड झाल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड, सहायक पोलीस निरीक्षक काळे यांना सन्मानित केले. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, राहुल सुतार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
हे सुद्धा वाचा : कोल्हापूर हादरलं! कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून, कारण काय तर…
दहा हजारांचे बक्षीस जाहीर
अटक करण्यात आलेले बहुतांश आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत. सर्वजण गावातील मुले आहेत. त्यांनी गावातच चोरी केल्याने पोलीसांसमोर चोरीचा छडा लावणे मोठे आव्हान होते. मात्र, पोलीसांनी मोेठ्या शिताफीने हा गुन्हा उघड केला. त्यामुळे वडगांव निंबाळकर पोलीसांनी अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी १० हजारांचे बक्षीस जाहिर केले.