संग्रहित फोटो
तासगाव : तासगाव-आरवडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या चतुराईपूर्ण कारवाईत गांजाची मोठी खेप पकडण्यात आली आहे. हॉटेलच्या बाजूला संशयास्पदपणे उभ्या असलेल्या मोटारीसह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चार किलोपेक्षा अधिक गांजा आणि आठ लाख रुपयांची मोटार असा तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई केल्याने तासगावातील अमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिस शिपाई विठ्ठल श्रीकांत सानप (वय ३३) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, अटक केलेल्या संशयिताचे नाव सचिन आप्पासाहेब निकम (वय ३०, रा. निकम वस्ती, डोंगरसोनी, ता. तासगाव) असे आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती मोटारीतून गांजाची विक्री करण्यासाठी आरवडे रस्त्याच्या दिशेने येत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला. तपासादरम्यान एका हॉटेलजवळ उभी असलेली मोटार पाहून पोलिसांनी झडती घेतली असता, सचिन निकम हा त्यातच आढळला. त्याच्या मोटारीतून चार किलो तीनशे पाच ग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे १,०८,५०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ८ लाख किंमतीची मोटार (क्र. MH 10 DB 5206) आणि गांजा असा एकूण ९ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तासगाव पोलिसांनी संशयिताची सखोल चौकशी सुरू केली असून, गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी घेऊन जात होता याचा तपास गतीमान झाला आहे. या कारवाईचे नेतृत्व उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी केले.
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
गेल्या काही दिवसाखाली गांजा विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे व महेश गाढवे यांच्या पथकाने केली आहे.






