संग्रहित फोटो
दौंड : खानवटे (ता. दौंड) येथील उजनी धरण पात्रात अवैध माती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर दौंड मधील महसूल, पोलीस आणि उजनी उपसा सिंचन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अवैध माती उपसा करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर या पथकाने कारवाई करून सदर ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या उजनीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे, नदीचे पात्र मोकळे झाल्याने माती चोरांनी अवैध माती उपसा सुरू केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना भीमा नदीचे मोठे पात्र लाभले आहे. त्यामुळे तालुक्यांच्या हद्दीचा मोठा फायदा आजपर्यंत येथील वाळू आणि माती तस्करांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
हे माती तस्कर मोठ्या प्रमाणावर अवैध माती उपसा करून भिगवण येथील वीटभट्टीसाठी विक्री करत असल्याची तक्रार महसूल विभागाला आल्याने ही कारवाई केली आहे.
भीमा नदीच्या पात्रात हे मातीचोर असंख्य ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने राजरोसपणे माती चोरी करतात. माती उपसा एवढ्या मोठ्या प्रमाणावर करत असताना त्यांना कशाचेच भय नसल्याचे त्यांच्या धाडसावरून दिसून येत आहे. या उपशावर वेळोवेळी कारवाया देखील करण्यात आल्या आहेत, मात्र कारवाई झाली की लगेच काही तासांतच या माती चोरांकडून माती उपसा पुन्हा सुरु होतो. त्यामुळे या तस्करांवर वचक बसण्यासाठी संयुक्तरित्या कारवाईची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली होती. अशताचं आता उपसा करताना दिसून आल्यामुळे सहा ट्रॅक्टर दौंड पोलिसांच्या ताब्यात जमा केले आहेत.
ही कारवाई दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणगाव मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई व तलाठी डोंगरे, गणेश महाजन व भीमा उपसा सिंचन विभागाचे अधिकारी विशाल घोडसे, संदीप जाधव व पुणे ग्रामीण पोलिस दलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज गोडसे यांनी केली.