नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण; खोलीत जाण्याच्या सूचना देताच...
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कैद्याला बराकमध्ये घेऊन जाताना त्याने जेलमधील पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळ्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृह शिपाई भाईदास शिवदास भोई यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बिलाल अली हुसेन शेख (शिक्षा बंदी क्र. १३६९५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कैद्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सर्कल नं. ३ येथे हा प्रकार घडला. भोई सायंकाळच्या सुमारास वेळ झाल्याने यार्ड क्र. ३ मधील बंद्यांना नित्याची कामे संपवून आपल्या बराकमध्ये जाण्याच्या सूचना करत होते. त्याचा राग बिलालला आला. त्याने भोई यांच्याशी वाद घातला.
हेदेखील वाचा : Rajasthan Crime: शेतात बोलावलं आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली, ८ दिवसानंतर आरोपी अटकेत; पैसे परत मागितल्याचा कारणाने रचला कट
भोई यांनी त्यास मंडल कार्यालयातील साहेबांपुढे हजर करतो, असे सांगितले. त्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत भोईना बेदम मारहाण केली. यावेळी अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला असून, या घटनेत भोईना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास हवालदार शेख करत आहेत.
किरकोळ कारणावरून तरुणाचा खून
किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता जेवणात बनवलेल्या भाजीत शाम्पूचे पाणी का टाकले, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एका मजुराने आपल्या सोबत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुराच्या डोक्यात वार करून खून केला. ही धक्कादायक घटना नाशिकच्या नांदूरशिंगोटे येथे काही दिवसांपूर्वी घडली.