नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर सेक्टर 8 मधील ‘व्हाईट ऑर्चिड स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने कारवाई केला आहे. या कारवाईत स्पा मालक, मॅनेजर व मदतनीस अशा तिघांना अटक करण्यात आली असून, तेथे देहव्यापारासाठी जबरदस्तीने ठेवलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खारघरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक पाठवून त्या स्पा सेंटरमधून सेवा घेण्याची तयारी दाखवली. बनावट ग्राहकाला महिलांची निवड करण्यास सांगितले गेले व त्याबदल्यात त्याच्याकडून तब्बल 6 हजार रुपये स्वीकारण्यात आले. पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाकडून ठरल्याप्रमाणे सिग्नल मिळताच, पोलिसांनी ताबडतोब छापा टाकला असता त्या स्पा सेंटरमध्ये देहव्यापार चालत असल्याची खात्री होताच, पोलिसांनी तातडीने कारवाई करत स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर व मदतनीस या तिघांना ताब्यात घेतले. तसेच तेथे जबरदस्तीने ठेवलेल्या 6 महिलांची सुटका करण्यात आली. अटक तीनही आरोपिंविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम (PITA) तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खारघर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, कुठेही अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक याबाबतची माहिती पोलिसांना देतील त्यांचे नावं गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक राहतात अशा या सुरक्षित असलेल्या ठिकाणी अशा घटना घडणं हे धक्कादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.