सौजन्य - सोशल मिडीया
पुणे Crime News : पुण्यात बनावट नोटाचा छापखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. छापखान्याचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीकडून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा तसेच नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करून मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.
मनिषा स्वप्निल ठाणेकर (रा. येरवडा), भारती तानाजी गवंड (रा. चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (रा. गहुंजे), नरेश भिमप्पा शेटटी (रा. लोहगाव) तसेच प्रभू गुगलजेड्डी (रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजश चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रूचिका जमदाडे, स्वालेहा शेख व त्यांच्या पथकाने केली.
शिवाजीनगर परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. शिवाजीनगर पोलीस तपास करत होते. तांत्रिक विश्लेषणात मनिषा ठाणेकर, भारती गवंड, सचिन यमगर यांची माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना ताब्यात घेतले. तसेच, चौकशीत त्यांना या बनावट नोटांचा पुरवठा नरेश शेटटी करत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी नरेशच्या घरी धाड टाकली. पोलिसांनी कारवाईत एकूण २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा, २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा, बनावट चलन निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. नागरिकांनी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.