सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत नागरिकांची ३८ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी मार्केटयार्ड भागातील ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व्यापारी आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजाराबाबत मॅसेज पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले होते. विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी त्यांना प्रथम काही परतावा देखील दिला. मात्र, नंतर त्यांना बँक खात्यात 21 लाख 40 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. नंतर परतावा देणे थांबविले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी महिलेची ६ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप तपास करत आहेत. विश्रांतवाडी भागातील तरुणाची देखील शेअर बाजारात गुंतवणुक व त्यावर जादा परतावा देण्याच्या आमिषाने ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक युवराज हांडे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; कोथरूडमध्ये महिलांचे दागिने चोरले
कारवाईची भीती दाखवून २३ लाखांची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाला २३ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याला मोबाइलद्वारे संपर्क केला. काळ्या पैसे व्यवहारात मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात तुमचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाला तातडीने पैसे भरण्यास सांगितले. ऑनलाइन पद्धतीने तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली कराड तालुक्यातील सात जणांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.