संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात पिस्तूलधाऱ्यांचा देखील सुळसूळाट झाल्याचे पाहिला मिळत असून, नांदेडसिटी पोलिसांनी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. साजन विनोद शहा (वय १९, रा. धायरी गाव), कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
नांदेड सिटी पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान आंबाईदरा भागात दोघेजण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती अंमलदार पुरूषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांना मिळाली. त्यानूसार वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस यांच्या सुचनेनुसार पथकाने या भागात सापळा लावला. संशयित दिसताच दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे देशी बनावटीचे दोन पिस्तूल व एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचे दोन पिस्तूल जप्त केले. शहा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा, खूनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने हे पिस्तूल आणले होते. ते कशासाठी आणले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : लाखो रुपयांची लाचेची मागणी भोवली; सोलापुरातील डॉक्टरला रंगेहात पकडले
आंबेगाव पोलिसांनी पिस्तूलधारी तरुणाला ठोकल्या बेड्या
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आर्यन बापू बेलदरे (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक निरीक्षक प्रियांका गोरे तपास पथकासह दत्तनगर परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी अंमलदार धनाजी धोत्रे आणि नीलेश जमदाडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. ‘आई श्री व्हिला अपार्टमेंट’जवळ थांबलेल्या तरुणाकडे पिस्तूल असल्याचे कळले. त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक प्रियांका गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातलेला असताना गुन्हे शाखेच्या युनिट चारने रात्रीच्या वेळी घरफोड्या करणाऱ्या एका चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एका दुचाकीसह पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. सौरभ शिवाजी साबळे (वय २६, रा. आदर्शनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.