संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात बंदी असणाऱ्या गुटख्याला मोठी मागणी असल्याचे तसेच तो गुटखा अवैधरित्या विक्री अन् त्याची वाहतूक करणाऱ्यांची साखळी मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून सातत्याने गुटखा पकडला जात आहे. मात्र, हे गुटखा डिलर मोकळेच राहत असल्याचे दिसत आहे. स्वारगेट पोलिसांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करत १८ लाखांचा गुटखा पकडला आहे.
सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४, रा. थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम बाळकृष्ण निंबाळकर (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण, महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थाची विक्री आणि वापरास बंदी घालण्यात आली आहे. गुटखा बंदी असताना शहरातील पानपट्ट्यांवर गुटखा विक्री होत आहे. शुक्रवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली. पथकाने लागलीच सापळा रचला. तसेच टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळून आला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले आहेत. दोघांनी शहरात गुटखा विक्री करण्यासाठी आणला होता. गुटखा कोठून आणला, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध
गुटखा बंदी असताना देखील पुण्यासारख्या शहरात गुटख्याची विक्री अन् वाहतूक खुलेआम होत असून वारंवार पोलिसांकडून गुटखा पकडला जात असताना गुटखा एजंट मात्र सुसाट सुटल्याचे दिसत आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने होते. असे असताना पुण्यात मात्र, गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक कारवायांमधून हे अधोरेखित देखील झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होत आहे.
शहरात सर्रासपणे गुटखा विक्री
पुणे शहरात अवैध व्यवसायासह गुटखा विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता. यापुर्वी पोलिसांनी पुण्यासह परराज्यात देखील गुटखा एजंटची धरपकड केली होती. त्यानंतर ही साखळी प्रथमच समोर आली होती. काही दिवस गुटख्याची चणचण जाणवल्यानंतर मात्र, आता शहरात गुटखा वाहतूक आणि विक्रेत्यांचे हे रॅकेट खुलेआम सुरू आहे. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके वॉच ठेवत असताना हे प्रकार नक्की कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.