संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गांजा तस्करीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसही गांजा तस्कांराना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता लोणी काळभोर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता आंग्रे वस्ती, सार्वजनिक रस्ता, लोणी स्टेशन परिसरात गणेश रावसाहेब गोडसे (वय २५, रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, मुळगाव सोनेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) व त्याचा साथीदार अक्षय रवि पवार (रा. लोणी काळभोर) हे गांजा विक्रीसाठी थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी पाठलाग करून गोडसे याला पकडले,
मात्र त्याचा साथीदार पवार हा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गोडसे याच्याकडून ११०४ ग्रॅम गांजा (किंमत २२ हजार रुपये) व गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो कार (किंमत २ लाख रुपये, क्र. एम.एच १२, डी.ई४९३७) असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अटक केलेल्या गोडसेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपआयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, तसेच हवालदार भोसले, माने, नागलोत, क्षिरसागर, जगदाळे, गाडे, धुमाळ व कटके यांनी सहभाग नोंदवला.