संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोेरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सॅलिसबरी पार्क परिसरात अपघात झाल्याची बतावणी करून कारचालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
रोहित सूर्यकांत कांबळे (वय २१), सागर शिवानंद जळकुटे (वय २४, दोघे रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३८ वर्षीय व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक संतोष तानवडे, यांनी केली आहे.
तक्रारदार व्यावसायिक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सॅलिसबरी पार्क परिसरातून मोटारीतून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून कांबळे आणि जळकुटे आले. त्यांनी मोटारीला पाठीमागून धडक दिली. मोटारीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी मोटारचालक व्यावसायिकाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. अपघात झाल्याची बतावणी करून मोटारचालकाकडे नुकसान भरपाईपोटी पैशांची मागणी केली.
मोटारचालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. आरोपी कांबळे आणि जळकुटे पसार झाले. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. मोटारचालकाला लुटणारे चोरटे गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुजय पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.
हे सुद्धा वाचा : Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेचा पत्ता सापडला? नेमकं कुठे बसलाय लपून?
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला पुण्यात लुटले
राज्यात लुटमारीच्या घटना प्रमाणात उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातमधील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाचे अपहरण करुन त्याला नदीपात्रात लुटण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बलभद्रसिंग नटवरसिंग जाडेजा (वय २५, सध्या रा. नलावडे सदन, गावकोस मारुतीजवळ, कसबा पेठ, मूळ रा. कच्छ, गुजरात) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.