Photo Credit- vanraj Andekar @ Facebook
पुणे: वनराज आंदेकर हत्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात शब्दाला अन् वेळाला खूप महत्व असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गेम हा एक फोन अन् खेळ ‘खल्लास’ अशा रितीने झाल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. तत्पुर्वी पोलिसांनी प्रत्यक्षात वनराज यांच्यावर हल्ला करणाऱ्या १३ जणांना अटक केली आहे. त्यातील ३ मुले अल्पवयीन आहेत. दहा आरोपींना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाना पेठेत रविवारी रात्री वनराज आंदेकर यांचा दहा ते पंधराच्या जणांच्या टोळक्याने दुचाकींवर येऊन कोयते व पिस्तूलातून गोळ्या झाडून खून केला. खूनात कौटुंबिक वाद, संपत्ती तसेच टोळी युद्ध अशा गोष्टींचा संबंध समोर आला आहे. दरम्यान, आता याप्रकरणात धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. केवळ एक फोन झाल्यानंतर दोन दिवसांतच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे.
हेही वाचा : Vanraj Andekar: सख्ख्या बहिणींनींच घडवून आणली वनराज आंदेकरांची हत्या; पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक
सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि प्रकाश कोमकर या तिघांची या हत्या प्रकरणात भूमिका महत्वाची आहे. मोक्का कायद्यात जामीनावर बाहेर आलेल्या सोमनाथला प्रकाश कोमकर जो वनराजची बहिण संजीवनीचा दिर आहे, त्याने फोन केला. तसेच आंदेकर टोळीबाबत संताप व्यक्त केला. लागलीच सोमनाथने अनिकेत दुधभातेला फोनकरून आणलेले पिस्तूल कुठे आहेत, अशी विचारणा केली. ते पिस्तूल व्यवस्थित असल्याचे सांगितल्यानंतर सोमनाथने पुन्हा अनिकेतला विचारले पिस्तूल यापुर्वी चालवले आहे का, त्यावर अनिकतने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर सोमनाथने पिस्तूलांसोबत हत्यारे देखील सोबत ठेवा. आपल्याला गेम वाजवायचा आहे, अशी माहिती दिली.
लागलीच अनिकेतने इतर आरोपींची जुळवा-जुळव केली. दुसऱ्यादिवशी अनिकेतने नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात येऊन पाहणी केली. दिवसभरात वनराजबाबत माहिती जमवली. त्याचदिवशी रात्री आरोपी एकत्र जमले आणि नंतर ते सातारा रस्त्यावरील मार्केटयार्ड भागात थांबले. त्याठिकाणी एकत्रित जमवून काही वेळ घालवला. वनराज चौकात आल्याची कुणकूण लागलाच ते दुचाकीने नाना पेठेत आले. त्यांनी येताच वनराज याच्यावर गोळ्या झाडत कोयत्याने सपासप वारकरून त्यांची हत्या करण्यात आल्याचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्यथा आणखीच गोळ्यांचे बार उडाले असते…
आकाश म्हस्के तसेच कदम व सॅम काळे यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. परंतु, म्हस्के याने पहिली गोळी झाडली. तर कदमचे पिस्तूल चालले नाही, ते लॉक झाले आणि सॅम काळे याच्या पिस्तूलातून मिस फायर झाल्याने गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत. इतर आरोपींच्या हातात कोयते होते, गोळीबार होताच आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. डोके व इतर ठिकाणी कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी वनराज यांचा मृत्यू झाला. अनिकेत दुधभाते व इतरांनी कोयत्याने वार केले.
हेही वाचा: वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ताम्हिणी घाटातून १३ जणांना उचललं
हल्ला करणारी टोळी सोमनाथ गायकवाडची
वनराज आंदेकरांवर प्रत्यक्ष हल्ला करणारे सर्व आरोपी हे आंबेगाव पठार भागातील आहेत. यात ५ आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले आहेत. ते सोमनाथ गायकवाड याच्याशी निगडीत आहेत. तत्पुर्वी सोमनाथला आंदेकर टोळीपासून धोका होता. त्याची भिती त्याच्या मनात होती. त्यात गेल्या वर्षी निखील आखाडे याचा झालेला खून, यामुळे बदलाची भावना होतीच, त्यातून हा खून सोमनाथ व त्याच्या टोळीने केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सोमनाथ कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो काय करतो शहरातच राहतो का, तो कधी येतो काय करता, याचा कसलाच थांगपत्ता नव्हता.