पुणे पोलिसांचा जुगाराच्या अड्ड्यावर छापा (फोटो- istockphoto)
पुणे/Pune Crime News: सध्या राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. जुगार, कोयता गॅंग, खून अशा स्वरूपाचे गुन्हे घडताना दिसून येत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी धनकवडी येथे मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी केली आहे. एका जुन्या पत्र्याची शेड असलेल्या भागात जुगार खेळला जात होता. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याचे समोर आले आहे.
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी धनकवडी येथे जुन्या कारखान्यात सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुणे पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा दाखल केले असल्याचे समजते आहे. पुणे गुन्हे शाखेला धनकवडी येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती.
उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये एक भाजप पदाधिकारी जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यासह अन्य आरोपींना अटक केली आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धनकवडी येथे जुगार खेळताना अटक करण्यात आलेला भाजपाचा पदाधिकारी पर्वती विधानसभा मतदारसंघातील असल्याचे समजते आहे. पुणे पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी करत १०,२५० रुपये, मोबाईल फोन जप्त केले आहेत.
बड्या जुगार अड्ड्यावर छापा
मोदी गणपती शेजारी तसेच महापालिकेच्या वाहनतळाच्या परिसरात सुरु असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात सहायक पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला असून, त्यासोबतच प्रविण बोदवडे, विजय महाडिकसह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुगार खेळणाऱ्या सहाय्यक फौजदार यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश भुजबळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन प्रविण काशिनाथ बोदवडे (वय ४४, रा. कात्रज) याच्यासह ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा जुगार अड्डा विजय महाडिक चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केल्याचे समजते. महेश महादेव भुतकर असे निलंबित केलेल्या सहायक पोलीस फौजदाराचे नाव आहे. ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीत नेमणुकीला होते. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.