सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट मंगळवारपासून सुरू केले असून, निर्जन स्थळे, टेकड्या, रेल्वे स्टेशन तसेच डार्क स्पॉट्स यांची तपासणी केली जाणार आहे.
महानगरपालिकेसोबत समन्वय साधून शहरातील रस्त्यांवरील स्ट्रीटलाईट्स वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. पोलिसांचे पेट्रोलिंग अधिक प्रभावी केले जाणार असून, त्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते म्हणाले, घटनेनंतर पोलीस अधिक कार्यतत्पर झाले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना करण्यात येत आहेत. निर्जन आणि धोकादायक भागांची तपासणी करून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाणार आहे. शहरात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अत्याचार प्रकरणानंतर पोलीस शहरातील महिला सुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना राबवत आहेत. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट सुरू केले असून, स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. यातील स्वारगेट एसटी स्थानकाचे सेफ्टी ऑडिट पूर्ण झाले आहे.
पुणे शहरातील अंधाऱ्या व निर्जन जागांची पाहणी सुरू केली असून, या भागात प्रखर पथदिवे बसविण्यास महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तर या भागात गस्त वाढविली जाणार आहे. सर्व ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंधाऱ्या व निर्जन जागांची पाहणी पोलिसांनी केली. भागात पथदिवे बसविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.
नराधम गाडेला अटक
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी काही पथके तयार केली होती. त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू होता. अखेर पोलिसांना यश आले आहे. इतकेच नाहीतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.