झोपेतच पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव, 15 दिवसापूर्वीच झालं होतं लग्न; आरोपी पत्नीला अटक (फोटो सौजन्य-X)
Sangli Crime News in Marathi: राजा रघुवंशी हत्याकांडाची देशभर चर्चा सुरू आहे . याचदरम्यान महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीतील कुपवाड येथील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणारे अनिल तानाजी लोखंडे (वय-50) यांची दुसरी पत्नी राधिका हिने हत्या केली. अनिल लोखंडे यांचा कुऱ्हाडीने वार करून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले आहे. मृत अनिल यांना दोन मुली होत्या आणि दोन्हीही विवाहित आहेत. अशा परिस्थितीत अनिल घरी एकटाच राहत होता. यामुळे अनिलच्या नातेवाईकांनी त्याचे लग्न सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वाडी गावातील २७ वर्षीय राधिका बाळकृष्ण इंगळेशी लावून दिले.
१७ मे २०२५ रोजी हा विवाह झाला. लग्नाच्या बरोबर १७ दिवसांनी वट पौर्णिमेच्या रात्री ११:३० ते १२:३० च्या दरम्यान राधिकाने अनिलच्या डोक्यावर आणि हातावर चाकूने हल्ला केला. अनिलचा जागीच मृत्यू झाला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, हत्येचे खरं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल आणि त्याची पत्नी राधिका लग्नापासून एकमेकांशी जुळत नव्हते. कारण राधिकाला तो आवडत नव्हता. त्यामुळे तिने रागावून तिचा पती अनिलची हत्या केली. घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भादवलकर घटनास्थळी पोहोचले. तात्काळ कारवाई करत संशयित पत्नी राधिकाला अटक करण्यात आली. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
दरम्यान, अनिल लोखंडेच्या हत्येमागे आणखी काही कारण आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. कारण या जोडप्याचे लग्न फक्त १७ दिवसांवर झाले होते. विशेष म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून परत आणले होते, अशी आख्यायिका आहे. म्हणून सुवासिनी महिला पतीच्या प्राणांचं रक्षण व्हावं आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं यासाठी व्रत करतात. परंतु, सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्री एका महिलेने आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.