संग्रहित फोटो
पुणे : इमारतीच्या टेरेसवर आयोजित केलेल्या मटण पार्टीत मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली अन् ३ मित्रांनी एका मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार तळजाईमाता वसाहतीत घडला आहे. तीन मित्रांच्या या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष त्या मित्राच्याच घराच्या टेरेसवर ही मटण पार्टी आयोजित केली होती. याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश उर्फ आशिष सुधाकर धडे (वय १९), क्रिश उर्फ केदार सचिन चव्हाण (वय १८) व गणेश सतिश वायदंडे (वय १९) यांना अटक केली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व आरोपी मित्र आहेत. तक्रारदार तरुणाच्या घरावरील टेरेसवर मित्रा-मित्रांनी मटण पार्टीचे आयोजन केले होते. मंगळवारी ही पार्टी आयोजित केली होती. दरम्यान, टेरेसवर मटण पार्टीचा बेत सुरू असताना काही मित्रांमध्ये वादावादी सुरू झाली. तेव्हा भांडण सुरू झाल्याने तक्रारदार तरुणाच्या चुलतीने त्यांना खाली येण्यास सांगितले. ते सर्व खाली आले. नंतर तक्रारदारांने मित्रांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग या तीन मित्रांना आला. त्यातील प्रथमेश याने तरुणाला तु का भांडणे सोडवतोस, मी इथला भाई आहे असे म्हणत त्याच्या कानशीलात मारली. नंतर दोघांनी या तरुणाला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच, प्रथमेशने कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले, असेही सांगण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
किरकोळ वादातून तिघांकडून खूनाचा प्रयत्न
धानोरीत किरकोळ कारणावरून तिघांनी एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक फरार झाला आहे. परशुराम राजू मानीके (वय २१), नागेश मानीके (वय १९, रा. दोघेही. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी व तक्रारदार ओळखीचे असून, एकाच भागात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्या रागातून धानोरीतील साईधाम सोसायटीजवळ तक्रारदारांना गाठून तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.