पत्नीला संपवण्याच्या नादात पतीनं गमवावा जीव, 6 लाखांची सुपारी घेऊन शूटरने पतीचाच केला खेळ खल्लास

15 नोव्हेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर तेजपाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलीस बराच काळ व्यस्त होते. दरम्यान, तेजपाल यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स पकडले गेले. त्याच्याकडे चौकशी केली असता या अंध खून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा समोर आला.

  उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये हत्येची एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या हत्येसाठी शुटर्सला ६ लाख रुपयांची सुपारी दिली. मात्र शुटर्संना पत्नीला मारता आले नाही. त्यामुळे सुपारीचे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून त्यांनी पतीलाच गोळ्या घालून ठार केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  हे संपूर्ण प्रकरण बुलंदशहरच्या काकोड पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे 15 नोव्हेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर तेजपाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. तेजपाल यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स पकडले गेले आहेत. त्यांना अटक करुन चौकशी केली असता खून प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

  पकडलेल्या शूटर बलराजने सांगितले की, खरतंर मृत तेजपालने त्याच्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाख 20 हजार रुपयांचे सुपारी शुटर्सला दिली होती. कारण, तेजपालला संशय होता की, त्याची पत्नी त्याच्या हत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. पण शूटर बलराज आणि त्याचा सहकारी दीप सिंग तेजपालच्या पत्नीला मारण्यात यशस्वी झाले नाहीत.

  अशा स्थितीत तेजपालला सुपारीत मिळालेले पैसे परत करावे लागू नयेत म्हणून त्यांनी सुपारी देणाऱ्यासाच मारण्याची योजना आखली. 15 नोव्हेंबर रोजी सुपारी खाणारे बलराज आणि दीप यांनी तेजपालच्या पत्नीची हत्या करण्याऐवजी तेजपालची गोळ्या झाडून हत्या केली. सध्या पोलिसांनी बलराज आणि दीपला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन लाख रुपये, एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

  सीसीटीव्हीमुळे वाचली पत्नी, पतीची हत्या

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलराज आणि दीप यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, प्रॉपर्टी डीलर तेजपालने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला आणि तिच्या हत्येसाठी 6 लाख रुपयांची सुपारी दिली. पण तेजपालची पत्नी जिथे राहत होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पकडले जाण्याच्या भीतीने बलराज आणि दीप तेजपालच्या पत्नीला मारू शकले नाहीत. अशा स्थितीत तेजपाल यांना सुपारीचे पैसे परत करावे लागले नाहीत, त्यामुळेच त्यांनी तेजपालची गोळ्या झाडून हत्या केली.