फोटो सौजन्य- सोशल मीडिया
यूपीएसी (UPSC) परीक्षा आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, परंतु यश काही मोजक्याच लोकांना मिळते. देशातील अनेक शिक्षक यूपीएसीसी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ‘दृष्टी आयएएस’चे (Drishti IAS) संस्थापक आणि प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांचेही असेच मानणे आहे की, आयएएस होण्यासाठी कोणत्याही जादूची नव्हे तर तीन मूलभूत सवयींची आवश्यकता आहे, चला तर मग जाणून घेऊया या तीन सवयींबद्दल..
विकास दिव्यकीर्ती सरांच्या मते, यूपीएससीच्या तयारीची सुरुवात चांगल्या अभ्यासाने होते. त्यांचे म्हणणे आहे की, फक्त पुस्तके संपवण्यावर लक्ष केंद्रीत करू नका तर प्रत्येक विषय खोलवर समजून घ्या. तुम्ही जे काही वाचाल ते बारकाईने वाचा. त्यामागील संकल्पना पूर्णपणे समजून घ्या, असा सल्ला ते देतात. एखाद्या मित्रांशी त्या घटकावर चर्चा करा आणि जोपर्यत तो विषय पूर्णपणे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याचा अभ्यास करा. तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एनसीईआरटीची (NCERT) पुस्तके हा सर्वात उत्तम सुरुवातीचा पाया मानला जातो.
विकास दिव्यकीर्ती सरांचा दुसरा सल्ला असा आहे की, यूपीएसी मुख्य परीक्षेत फक्त माहिती असणे पुरेसे नसते. तर ती माहिती मर्यादित शब्दांत आणि प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. मुख्य परीक्षेतील सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे उत्तर लेखन होय. दिव्यकीर्ती सरांच्या मते, उमेदवरांना रोज लिहण्याची सवय लावली पाहिजे. हजार शब्दांची माहिती २०० ते २५० शब्दात संकलित करण्याचा सराव केला पाहिजे, यामुळे विचार करण्याची आणि लिहण्याची क्षमता विकसित होते. उत्तरांमध्ये जास्तीत जास्त तथ्ये, आकडेवारी आणि अधिकृत माहितीचा समावेश करावा कारण यूपीएससीमध्ये तथ्यांवर आधारित उत्तरे जास्त प्रभावी मानली जातात.
दिव्यकीर्ती सरांची तिसरा सल्ला असा आहे की, अनेक उमेदवार अभ्यासावर आणि लिहिण्याकडे लक्ष देतात. पण बोलण्याची कलेकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात संवादाची सवय विकसित केली, तर मुलाखतीची वेगळी तयारी करण्याची गरज पडत नाही. मित्रांसोबत चर्चा करा , ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्या आणि आपले मत उघडपणे मांडा्यला शिका. कॉलेजमधील वादविवाद स्पर्धा, ड्रामा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांमध्ये भाग घेतल्याने व्यक्तिमत्त्व विकासात मदत होते. यामुळे आत्मविश्वास वाढून इंटरव्यू बोर्डासमोर आपली बाजू मांडण्यास मदत होते.
महत्त्वाचा सल्ला: दिव्यकीर्ती सरांंच्या मते, सुरुवातीच्या उमेदवारांसाठी दररोज ६ ते ७ तासांचा अभ्यास पुरेसा असतो. मात्र, जसजशी तयारी गंभीर टप्प्यावर पोहचते, तसतसा वेळ हळूहळू ८ ते १० तास केला पाहिजे. जेव्हा एखादा उमेदवार आपल्या ध्येयाप्रती पूर्णपणे समर्पित होतो,तेव्हा त्याला कोणत्याही प्रेरणेची गरज भासत नाही.






