सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात एका आईने आपल्या लहान मुलाला विष पाजून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव अंकिता वैभव उकिरडे असे असून ती विवाहित होती. तिला १४ महिन्यांचा मुलगा होता. तिने प्रथम आपल्या मुलाला विष पाजले आणि नंतर साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
अंकिता हिचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात आपल्या चिमुकल्यासह एकटीच होती. नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या मोलकरणीला घरात कोणी दिसले नाही. संशय आल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, अंकिता सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तर चिमुकला अन्विक अत्यवस्थ अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळून आला.
घटनेनंतर तातडीने अन्विकला बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की मुलाने विष सेवन केले असले तरी त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे. मात्र त्याची प्रकृती अजूनही गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या या चिमुरड्याचे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अंकिता उकिरडे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असून मानसिक ताण किंवा कौटुंबिक वाद हा कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर वाणी प्लॉट परिसरात तसेच बार्शी शहरात शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप चिमुकल्याला या दुर्घटनेचा सामना करावा लागत आहे, हे अधिक वेदनादायक आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील चौकशीअंती आत्महत्येचे खरे कारण उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…
Ans: बार्शी
Ans: अंकिता
Ans: अन्विक






