मुख्याध्यापकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली 'ती' सुसाईड नोट चर्चेत; लॉकरमध्ये अंत्यविधीसाठी ठेवले 50000 रुपये अन्... (File Photo : Principal Death)
नाशिक : नाशिकच्या जेल रोड भागात एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. लता मुरलीधर जोशी (वय 76) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 80) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. मुरलीधर जोशी हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी चर्चेचं कारण ठरत आहे.
बुधवारी सायंकाळी मोलकरीण घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांची आजारी पत्नीची हत्या करून स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी ‘मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिची आजारपणातून सुटका करत आहे…’ असे लिहून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी स्वतःही गळफास घेतला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते. त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात. अधून-मधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई-वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आई-बाबाला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचे. मात्र, लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या.
मेंदूच्या विकाराने लता होत्या ग्रस्त
2017 सालापासून लता जोशी यांना मेंदू विकाराचा त्रास होता. एकदा त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकरणी ठेवली होती. ती महिला 24 तास जोशी दाम्पत्यासोबत त्यांच्याच घरात राहत होती. मात्र, जेव्हा ती घरी नव्हती. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये…
“मी मुरलीधर रामा जोशी. पत्नीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. याच्याशी कोणाचा काहीही संबंध नाही. मी खुशीने आत्महत्या करत आहे. तसेच मी लताचा गळा दाबून शेवट करत आहे. पोरांनी मला माफ करावे. सीमाने (गृहसेविका) खूप सेवा केली. तिला माझ्याकडून 50 हजार रुपये चालू खात्यातून द्यावे. ती बाहेर गेली असताना मी हे कृत्य करत आहे. तिचा संबंध नाही. तिच्या मुलाची फी भरण्यासाठी पैशांचा उपयोग होईल’.
अंत्यविधीसाठी ठेवले 5 हजार
लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले पाच हजार अंत्यविधीसाठीचे पैसे आहेत. मंगळसूत्र, जोडवी आहेत. ते लताला घालावेत. नंतर सीमा राठोड हिला द्यावेत. माझे देहदान करावे. लताचा तुमची इच्छा असल्यास अंत्यविधी करावा. माझी आत्महत्या फेल झाली तर मात्र वृद्धाश्रमात ठेवावे. माझ्या कृत्यास कोणीही जबाबदार नाही, असेही लिहिले आहे.