ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील शास्त्रीनगर भागातील प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : शहरातील गुन्हेगारीच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. पुण्यातील शास्त्रीनगर भागामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) एका मद्यधुंद तरुण आणि त्याच्या मित्राने भरधाव गाडी चालवत महिलांसमोर अश्लील वर्तन केले. याचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना जागतिक महिला दिनाच्या दिवशीच घडल्याने ती अधिक गंभीर मानली जात आहे. प्रकरणातील मद्यधुंद तरूणाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. या प्रकरणावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील या धक्कादायक प्रकारावरुन राज्यभरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरुन पुणे पोलिसांना घेरले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “पुण्यातील शास्त्रीनगर येरवडामध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे. पण त्याचसोबत त्याच परिसरामध्ये त्याच शास्त्रीनगरमध्ये साधारणतः एक महिन्यापूर्वी आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीचा सपासप वार करुन भरदिवसा खून करण्यात आला. तरी सुद्धा या भागामध्ये पोलिसांचा म्हणाव तसा गस्त आणि बंदोबस्त वाढवला जात नाही. हे त्याही पेक्षा जास्त चिंताकारक आहे,’ असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “वाघोली, धानोरी, विमाननगर किंवा विश्रांतवाडी या परिसरामध्ये पब बार वाढत आहे. आणि त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी हे घडणारे प्रकार सातत्याने वाढत आहेत. मुळात येथील पोलीस यंत्रणा करत तरी काय असते? पोलीस आयुक्त हे या प्रकरणामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नाहीत का? की पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी पोलीस आयुक्तच काम केलं पाहिजे. यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि प्रशासनामध्ये असणारे सर्व नेत्यांना यामध्ये रस नाही का? कारण ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत याचा जेवढा निषेध करावा आणि जेवढी घृणा करावी तेवढी कमीच आहे, ” असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “आता पुण्यामध्ये घडलेल्या घटनेमधील गाडी ही कोणत्या मनोज आहुजा नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. परंतू अजूनही या व्यक्तीला अटक झालेली नाही? अजूनही पोलिसांनी ही गाडी हस्तगत केलेली नाही. एकीकडे पोलीस तानाजी सावंत यांच्या प्रकरणामध्ये वरच्यावर हवेतील विमान खाली आणू शकतात. हवेत होणारा गुन्हा हा पोलिसांना टाळता येतो त्यांना जमिनीवर होणार गुन्हा का रोखता येणार नाही?’ असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणामध्ये मद्यधुंद तरूणाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. तर त्याच्या वडिलांचे नाव मनोज अहुजा आहे. या प्रकरणातील आरोपी तरूणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तरूणाच्या वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. “तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. या प्रकरणानंतर पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी माझ्याच नावावर आहे. माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर त्याने थेट माझ्या तोंडावर अपमानास्पद कृत्य केल्यासारखे वाटते. माझ्यावर जी काही कायदेशीर कारवाई होईल, ती मला पूर्णतः मान्य आहे,असे मत मनोज अहुजा यांनी व्यक्त केले आहे.